माझे प्रवास वर्णन
अन्नदाती भिकारीण...
माझ्या भटकंतीच्या दरम्यान घडलेल्या हा प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. चार वर्षांपूर्वी मे महिन्याच्या सुट्टीत मी माझे कुटुंब व माझ्या मित्राचे कुटुंब असे आम्ही देवदर्शन व भ्रमंतीसाठी दोन गाड्या करून बाहेर पडलो. चार दिवस गड किल्ले फिरून व देवदर्शन करून आम्ही परतीच्या वाटेला निघालो.गावी घरी जाण्याची ओढ लागली होती.
या सर्व प्रवासात गुगल मॅप आम्हाला खूप मदतीचा ठरला होता. नवनवीन पर्यटन स्थळे शोधून तिथपर्यंत पोचवण्याचे काम गुगल मॅप करीत होता. त्यामुळे या सर्व प्रवासात आम्हाला कोणालाही पत्ता न विचारता पर्यटन स्थळे शोधता येत होती. त्यामुळे आम्ही खुश होतो. गुगल मॅप ला मनापासून धन्यवाद देत होतो.
पण आयत्यावेळी या गुगल मॅप आम्हाला दगा दिला होता. परतीच्या प्रवासात आम्ही आमच्या गावचा पत्ता गुगल मॅप टाकला आणि आमच्या दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हरला सांगितले याप्रमाणे आपल्याला पोहोचायचे आहे. ड्रायव्हरही निश्चिंत होते. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. काही अंतर गेल्यावर एका वळणावर गुगल मॅप मध्ये आम्हाला शॉर्टकट छोटा रस्ता दाखवत होता. या शॉर्टकटने गेलो असता आमचे प्रवासाचे दोन तास वाचणार होते. हायवेने गेले असता दोन तासाचा प्रवास वाढणार होता. त्यामुळे आम्ही त्या शॉर्टकटने जाण्याचे ठरवले व दोन्ही गाड्या त्या रस्त्याला लागल्या. काही अंतर गेल्यावर हे छोटासा घाट लागला.घाटात असताना आमचे मोबाईल नेटवर्क गेले. घाट संपल्यावर पुन्हा मोबाईल नेटवर्क येईल असे आम्हाला वाटले. घाट संपल्यानंतर पुढे जंगल सुरू झाले. कोणाचेच नेटवर्क काही येईना त्यामुळे गुगल मॅप बंद .
आता झाली पंचायत? आता पुढे कसे जायचे असा प्रश्न आमच्या समोर पडला. काही अंतर गेल्यावर पुढे दोन रस्ते दिसले. आता कुठल्या रस्त्याने जावे.जंगलामध्ये चिटपाखरूही नव्हते. फारशी वर्दळ नव्हती. आमच्या मागेपुढे गाडी नव्हती. बराच वेळ कोणीतरी येईल म्हणून वाट पाहिली परंतु नंतर जंगलामध्ये एवढा वेळ थांबणे धोक्याचे आहे अशा मला वाटलं , मी अंदाजे ड्रायव्हरला उजवीकडील रस्त्याने गाड्या घेण्यास सांगितले. जंगलामध्ये कुठेच लोकवस्ती नव्हती. दोन अडीच तास प्रवास केल्यावर आम्हाला एक छोटेसे गाव दिसले. सर्वांना हायसे वाटले. पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक शेतकरी शेतात काम करताना दिसला. गाडी थांबून आम्ही त्याला शिरूरला जायला हा रस्ता बरोबर आहे का? असे विचारले. तेव्हा तो प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे पाहू लागला.
साहेब तुम्ही रस्ता चुकलात..
जंगलामध्ये जिथून तुम्ही डाव्या बाजूला वळलात त्याऐवजी तुम्हाला उजव्या रस्त्याने जायला हवे होते. आता तुम्हाला परत मागे फिरावे लागेल. गुगल मॅप वर आम्ही विसंबून राहिलो आणि पूर्ण फसलो होतो. आता परत फिरण्या शिवाय काही पर्याय नव्हता. सकाळपासून काहीच न खाल्ल्यामुळे सर्वांच्याच पोटात कावळे ओरडू लागले होते. तेव्हा या गावात काही हॉटेल किंवा जेवणाची सोय होईल का? असे त्या शेतकऱ्याला विचारलं. तो म्हणाला साहेब छोटेसे गाव आहे इथे हॉटेल वैगरे तुम्हाला मिळणार नाही पण घरगुती जेवणाची कुठे सोय होत असेल तर पहा.
आम्ही पुढे निघालो. गाव छोटेसे होते रस्त्याच्या कडेला दोन चार छोटी छोटी दुकाने दिसत होती पण हॉटेल काही दिसेना. गाव संपत आले तेव्हा एका झाडाखाली एक वयस्कर आजी बसलेली आम्हाला दिसली. गाडी थांबून तिच्याकडे चौकशी केली.गावात काही घरगुती जेवण मिळेल का?
अज्जीन थोडा विचार केला व म्हणाली, मिळेल ना..
या माझ्या बरोबर..
आम्ही झाडाच्या सावलीत गाड्या लावल्या व चालत सर्वजण तिच्या झोपडीकडे निघालो. आजीने एक दहा मिनिटात गरम गरम भाकऱ्या आणि गरम पिठले आमच्यासमोर आणून ठेवले. सर्वांना प्रचंड भुका लागल्या होत्या. त्यामुळे अक्षरशः त्या गरम जेवणावर अम्ही सर्वजण तुटून पडलो. चुलीवरच्या गरम भाकऱ्या आणि पिठलं खाताना गावच्या आजीची आठवण आली. जेवण झाल्यावर सर्वांनी तृप्त मनाने आजीला धन्यवाद दिले व हिशोबाने जेवढे पैसे होतील त्यापेक्षा शंभर रुपये जास्त मी आजीला दिले. वरचे पैसे घेत नव्हती तरीही आम्ही जबरदस्तीने दिल्यानंतर तीने ते घेतले. तीचा निरोप घेऊन आम्ही सर्वजण गाडीकडे आलो. सर्वजण गाडीत बसले, माझ्या इतर कुणाच्या मोबाईलला रेंज नसल्याने घरी निरोप कसा द्यावा याची चिंता मला लागली होती. एव्हाना आम्ही घरी पोहोचायला हवे होते पण रस्ता चुकल्याने आम्ही भरकटलो होतो.
रस्त्याच्या पलीकडे टपरीवर सार्वजनिक फोन दिसत होता.
त्या फोनवरून तरी घरी निरोप द्यावा या उद्देशाने मी रस्ता क्रॉस करून त्या टपरी कडे पोहोचलो. एक रुपयाचा कॉईन टाकून घरी निरोप दिला की आम्ही रस्ता चुकल्याने आम्हाला उशीर होईल. थोडक्यात माहिती सांगून मी फोन ठेवला त्याबरोबर तो दुकानाचा मालक मला म्हणाला..
साहेब तुम्ही सर्वजण त्या म्हातारीकडे जेवलात वाटतंय ?
मी म्हणालो हो रे बाबा.. इथे कुठे हॉटेल दिसेना म्हणून तिच्याकडे जेवण घेतले..
आज्जीचे जेवण छान होतं..
तो म्हणाला...
साहेब तुम्ही फार मोठी चुकी केलीत..
मला कळेना यात काय मोठी चूक आहे?
मी त्या दुकानदाराला विचारले..
तसा तो म्हणाला....
भाऊसाहेब अहो ह्या म्हातारीला कोणीही नाही.
गावात फिरून जोगवा मागते, पिठ व धान्य गोळा करते. त्याच्याच भाकरी व जेवण तुम्हाला तिने बनवून दिले आहे, तसेच जेवण बनवताना जे पाणी वापरले आहे ते तिच्या घरा मागच्या नदीचे आहे. या नदीचे पाणी आजुबाजुच्या केमिकल कंपन्यांमुळे दूषित झाले आहे. त्यामुळे गावातले कोणीही ते पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरत नाही. त्या भिकारणीने बनवलेले त्या नदीच्या दूषित पाण्याचे तुम्ही सर्व जेवण जेवला आहात. त्याचे बोलणे ऐकून मी थोडावेळ स्तब्ध झालो. पुढे बराच प्रवास करायचा आहे, प्रवासात आम्हाला काही त्रास होणार नाही ना, त्या आज्जीचे जेवण बाधणार तर नाही ना, अशी भीती मनाला चाटुन गेली.
काही न बोलता मी गाडीत येऊन बसलो. गाडी सुरु झाली तेव्हा मी सर्वांना विचारले आजीचे जेवण कसे होते. मुलं व बायको म्हणाली खूप छान होते. यातच मला सर्व काही मिळाले होते. आम्ही उशिरारात्री घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आराम करून मुंबईकडे निघालो पण प्रवासात किंवा दुसऱ्या दिवशी आम्हा कोणालाही काही त्रास झाला नाही. ज्या वेळी हा प्रसंग मला आठवतो तेव्हा मला असे वाटते ती त्या आजीने आम्हाला प्रेमाने आणि मनापासून जेवू घातले होते, त्यामुळे आम्हाला कोणालाच काहीच त्रास झाला नाही.
अन्नदाती आजीने मनापासून प्रेमाने व आपुलकीने दिलेले जेवण आम्हाला कसे बाधणार होते. गुगल मॅप ने केलेली फजिती व अन्नदाती आजीचे जेवण या दोन गोष्टी मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही...
लेखक -
श्री. अशोक वेताळ
मुख्याध्यापक- शिशुविकास मंदिर
' गुरु ' म्हणजे एक समुद्र ,ज्ञानाचा,......
पवित्र्याचा, एक आदरणीय कोपरा, प्रत्येक व्यक्तीच्या मनातला......
माझे आदर्श, माझे गुरुवर्य, माझे श्रद्धास्थान... आदरणीय श्री.रविकांत अणावकर गुरुजी (आबा)त्यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत...म्हणजे हे त्यांचे सहत्रदर्शनचंद्र बघितल्याचे वय....पण मी काही अलंकारीक किंवा वाहवा मिळावी म्हणून हे लिहीत नाही...तर गुरु विषयी एक कृतज्ञता शब्दबद्ध व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे असे वाटते...इतकेच...मी इयत्ता ५ वी मध्ये मह्नगर पालिका शाळेतून , कराची (आत्ताची भाटीया हायस्कूल) हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला . वयाच्या १० व्या वर्षा पासून सरांच्या संपर्कात मी आलो . सर त्यवेळी ५ वी ते १० वी वर्गाना इग्रंजी विषय शिकवायचे . श्री.रविकांत अणावकर सर कराची शाळेत मला जवळजवळ सहा वर्ष शिकवायला होते. अगदी मस्त शिकवायचे.. ते विद्यार्थीवर्गात प्रचंड लोकप्रिय शिक्षक होते. सर माझे जीवनाचे आणि शिक्षण क्षेत्रातले आदर्श गुरु होते आणि आज ही आहेत....त्यांचे हासणे म्हणजे हापूस आंब्या सारख . त्यांना रागवताना किंवा विद्यार्थ्यांना मारताना आम्ही कधीच पहिले नव्हते. पण सरांची एक आदर युक्त भिती मात्र आम्हा विध्यार्थ्यांना असे . मे १९८५ मध्ये मी जे जे स्कूल आर्ट मधून ए.टी.डी. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. रिझल्ट लागल्या बरोबर बायोडेटा व पेढे घेऊन संध्याकाळी सरांच्या घरी गेलो . सरांना खूप आनंद झाला , सरांनी बायोडेटा ठेवून घेतला व म्हणाले,“ हे बघ आपली शाळा विना अनुदानित आहे, " पगार ही २०० रुपये,३०० रुपये आम्ही शिक्षकांना देतो , तोही वेळेवर मिळेल याची शासवतीनाही. “मी म्हणालो ,“सर मला तुमच्या मार्गदर्शनाखाली शिशुविकास मंदिर हायस्कूल मध्येच काम करायचे आहे “माझा ठाम निश्चय पाहून सरांनी मला समजावले,“ हे बघ सध्या आपल्या शाळेत एक कला शिक्षिका कार्यरत आहे .“ माझ्या शाळेत सध्या वेकेन्सी नाही आहे .”“ तुझे क्वालीफिकेशन आहे ", " तु अनुदानित शळेत प्रयत्न कर ", " नोकरी तुला नक्कीच मिळेल ",मी थोडासा नाराज झालो व सरांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो . जून १९८५ मध्ये भांडूप, येथील अनुदानित शाळेत मला नोकरी मिळाली . पण मन त्या शाळेत रमत नव्हते.. १९८९ च्या मे महिन्यत मला सरांचा निरोप आला, की आपल्या शाळेतील कला शिक्षिकेला अनुदानित शाळेत नोकरी मिळाल्याने, त्या शाळा सोडून गेल्या आहेत . जून पासून एक कला शिक्षकाची गरज आहे . दुसऱ्या दिवशी सकाळी सरांच्या ऑफिसमध्ये मी पोहचलो . सरांनी माझी चौकशी केली व म्हणाले“ तुझ्या परिचयाचा कला शिक्षक आहे का ? ”मी म्हटले," हो अहे ना..!!!“ मी स्वतः "" अर्ज घेऊन आलोय आहे ”" मी भांडूपची शाळा सोडून आपल्या शाळेत काम करायला तयार आहे." सर म्हणाले “तु अनुदानित शाळा सोडून , विनाअनुदानित शाळेत येतोय ,पुन्हा एकदा विचार कर. “ पण मी ठामपणे सागितले ,“ मला आपल्याच शाळेत काम करायचे आहे.”माझा दृढ निश्चय पाहून सर म्हणाले,“ सोमवारी १३ जुन रोजी शाळेत रुजू व्हा.” मला अतिशय आनंद झालl व मी कामाला सुरुवात केली. ज्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मी विदयार्थी अवस्थेत शिकलो , त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यांना शिकवण्याचा परमोकच्च आनंद मला मिळत होता. काही कालावधी नंतर माझ्या शिक्षक पदाची मान्यता घेण्यासाठी शिक्षण विभाग कार्यालयाने माझ्या पुर्वीच्या शाळेतील डीसचार्ज सर्टिफिकेट व त्या शाळेतील सर्विस बुक याची मागणी केली . ते घेण्यासाठी मी भांडुपच्या शाळेत गेलो असता त्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी डीसचार्ज सर्टिफिकेट व त्या शाळेतील सर्विस बुक देण्यास नकार दिला, तेव्हा सरांनी पुढाकार घेऊन त्या वेळचे शिक्षण निरीक्षक मा. श्री. वाघोदे साहेब यांचे प्रयत्नाने माझा प्रश्न सोडवला .. अशा छोट्या छोट्या खुप गोष्टी आहेत की जेणे करुन समोरच्याला अजुन आनंद कसा देता येइल याचा सर सतत विचार करत असत आणि आज ही करतात, ते हे विशेष.... आजही या वयात त्यांच्याकडे सृजनात्मक उर्जा आहे. ते सतत म्हणतात " ही सृजनात्मक उर्जा मला माझ्या आजोबा कडून मिळाली आहे व ती माझ्या समाजातील प्रत्येक घटकाला पोहचविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.".. अजुन किती आणि काय काय वर्णन करु अणावकर सरांविषयी... खरोखरच मी भग्यवान आहे... माझे भाग्ये ... सरांचा विदयार्थी म्हणून सरांच्या संपर्कात आलो ... सरांच्याच शाळेत शिक्षक झालो ..... सरांच्या मार्गदर्शना खाली ३४ वर्ष माध्यमिक विभागात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होतो... व ... मे २०१७ पासून माध्यमिक विभागात मुख्याध्यापक म्हणून मी कार्यभार स्वीकारला आहे.....
सागराचे वर्णन जसे अमर्यादीत तत्सम आहे...तरी ही मला जसे
जमेल तसे, मला भावलेले माझे प्रेमस्वरुप अणावकर सर
(आबा) इथे शब्दबद्ध करायचा छोटासा प्रयत्न केला आहे...
- धन्यवाद !!!!!
लेखक,
श्री. अशोक रा. वेताळ
मुख्याध्यापक - शिशुविकास मंदिर हायस्कूल ( माधामिक विभाग )
- धन्यवाद !!!!!
🎨 एक कला शिक्षक..🙏🏻
फारच उत्तम लिखाण वेताळ सर.. प्रवास वर्णन अतिशय भावपूर्ण झाले आहे. असेच लिहित रहा, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!! आपला एक वाचक
ReplyDeleteखूप सुंदर विचार मांडले आहेत श्री. अशोक सर. श्री. अणावकर सरांविषयीचे आपले विचार मनाला खूपच भावले कारण ते व्यक्तिमत्त्वच तसे आहे.प्रेरणादाई.......... वाचक श्री. भोसले सर कुर्ला
ReplyDeleteवेताळ सर, सर्व कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन.अशीच प्रगती करीत रहा.BE BLESSED. श्री. हादगे सर मुंबई
ReplyDeleteसर्व कौतुकास्पद कामगिरीबद्दल आपला अभिमान वाटतो आहे.
ReplyDeleteआदरणीय वेताळ सर ,
ReplyDeleteआपला आजीचे जेवण हा
अनुभव फार फार आवडला ..
लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा
,,,,,,आपला,,,, श्री.ससाणे सर.. नवी मुंबई.
अशोक सर आयुष्यतील हा चांगला अनुभव लिखाणातून शेअर केला आहे, वाचून खूप छान वाटलं. 👌💐 श्री. सतीश खोत, ठाणे
ReplyDeleteआपल्या सर्वांच्या स्फूर्तिदायक प्रतिक्रियांसाठी मनपूर्वक आभार मानतो....
ReplyDeleteअश्याच शुभेछा व शुभ आशीर्वाद सोबत असावेत हीच प्रेमळ सदिछा !!!!
पुनश्च आपले सर्व वचणप्रिय मान्येवारांचे आभार !!!!!!!!!!!!!!!!!!!